विश्वात। तयांची। नसे कुणा सर ।माता-पिता थोर। देवाहूनी ।।..

 *कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या एन.एस.एस. शिबिरात निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न* 


 *कवी अरुण पवार , दिवाकर जोशी , सिद्धेश्वर इंगोले यांच्या कवितेने रंगत आणली.* 


 


   परळी , दि 25/03/2022 (प्रतिनिधी )

कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथचे एन. एस. एस. शिबीर मिरवट येथे चालू आहे. संस्थेचे अध्यक्ष , मा. संजय देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष - प्रा.प्रसाद देशमुख , प्राचार्य डॉ. एल . एस . मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या या एन.एस.एस. शिबिराच्याअंतर्गत आज  दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे  कविसंमेलन आयोजित केले होते. त्यात कवी अरुण पवार ,दिवाकर जोशी ,सिद्धेश्वर इंगोले या कवींनी सहभाग नोंदविला.आपल्या गोड गळ्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेल्या कवी अरुण पवार यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून हास्याचे तुषार उडवत उडवत अंतर्मुख करायला लावणाऱ्या सामाजिक कविताही सादर केल्या.

' पांढरं सोनं पिकवलं का मातीमोल विकू 

मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू '

    या त्यांच्या प्रसिद्ध कवितेबरोबरच नवीन गझल , शेतकरी स्त्रीची दुःख व्यक्त करणारी पण आशावादी असलेली कविता 'भेगाळली भुई 'याचबरोबर वृद्धांच्या समस्या मांडणारी अर्थातच केवळ समस्या मांडून थांबणारी नाही तर वृद्धांच्या समस्या सोडवून घराला घरपण देणारी घरं जोडणारी -

"वायली राह्यली मुलं 

राह्यली वायली मुलं 

दोघांची वाटणी 

माय परसात

 बाप गोठ्याचा धनी "

ही कविता सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांच्या डोळ्यामध्ये आसवं उभी केली.

    याप्रसंगी कवी व गझलकार दिवाकर जोशी यांनी आपल्या नाविन्यपूर्ण व दमदार गझलेच्या माध्यमातून स्त्रीचे भावविश्व साकार करत तिच्या स्वातंत्र्याचा विचार मांडणारी -

    "आरशात एकदा तरी जरा खुलून बघ

घोळक्यात राहतेस, एकटी जगून बघ


आसवे जरी तुझी नदीसमान आटली

वेदना नको उरात, मोकळे रडून बघ


रात्र रात्र जागतेस काळजीत तू सदा

चांदणे नभातले कधीतरी फिरून बघ "

    ही चामर वृत्तातील गझल सादर करून रसिक मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याचबरोबर त्यांनी सादर केलेल्या 

"दिवस कधी हे सरायचे

घरात बसून झुरायचे "

  या विडंबनातून लॉकडाऊन काळातील मांडलेली पुरुषाची व्यथा ही पोट धरून हसायला लावणारी होती.

  कवी सिद्धेश्वर इंगोले यांनी आई - वडिलांचे महत्त्व प्रतिपादन करणारी अभंग रचना -

"त्या  जन्मदात्यांचा ।

ना  पडो      विसर ।

केला       जन्मभर ।

त्याग  ज्यांनी।।..........


विश्वात।      तयांची।

नसे     कुणा    सर ।

माता-पिता      थोर।

देवाहूनी ।।


............

  असे  संस्कार करणारी संवेदनशीलता तेवत ठेवणारी ठरली. त्याचबरोबर -

."भेगाळल्या भुईवर  तिचे भेगाळले पाय

काटे तुडवत चालते,  नाही रुतण्याचं भय

कष्ट कायम पदरी जसं गोंदलं गोंदण

वटी बांधून पोटाला येचतिया पांढरं सोनं... "

 अशी कष्टकरी शेतकरी स्त्रीची चित्रं उभं करणारी कविता सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली.

   कविसंमेलनाचे सूत्रसंचालन करणाऱ्या प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी -

" मनाचा डोले पिसारा तुझ्या येण्याने

फुले झाली आसवांची तुझ्या येण्याने

किती गाऊ गोडवे मी पावसा आता

बळी गातो गीत तेची तुझ्या येण्याने "

    ही कविता सादर करून बळीराजाची पावसाच्या आगमनानंतर होणारी आनंदी मनोवृत्ती आपल्या शब्दातून अभिव्यक्त केली.

      हास्य ,शृंगार ,करूण,अद्भुत अशा विविध रसांनी युक्त असलेल्या कवितातून सलग दोन तास उपस्थित रसिक श्रोत्यांना निमंत्रित कवींनी मंत्रमुग्ध केले .

 याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस .एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ .पी व्ही .गुट्टे ;सहकार्यक्रमाधिकारी प्रा. आर.एल .जोशी , प्रा. रंजना शहाणे , प्रा. कल्याणकर , दुधाट हे.गो. , कट्टे अनिल , पांडुरंग किटाळे , विनोद आचार्य   यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पी.व्ही . गुट्टे यांनी सूत्रसंचालन  प्रा. राजकुमार जोशी  यांनी तर आभारप्रकटन प्रा. कल्याणकर आर. बी. यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

कै.ल .दे.महिला महाविद्यालयात ' भाषा वाङ्‌मय मंडळाचे उद्‌घाटन '*

संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाजशिक्षक- संजय देशमुख*

*कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान '*